पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचा परिणाम मॉन्सूनच्या पुढील वाटचालीवर होण्याची शक्यताअसून, येत्या ४८ तासांत गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागात मॉन्सूनचे आगमन होऊ शकते. तळ कोकणात ११ ते १३ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मंगळवारी मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही ठिकाणी पुढे वाटचाल केली.याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की,बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात होईल. १० अथवा ११जून रोजी मॉन्सूनचे गोवा, तळकोकणात आगमन होणार आहे. त्यानंतर १४ अथवा १५जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात १२ किंवा १३ जून, मुंबईत १३ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
कोकणात १२, १३ व १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १२ जूनपासून मॉन्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सूनच्या नव्या तारखांनुसार गोव्यात मॉन्सूनचे आगमन ५ जून रोजी आहे. यंदा त्याला थोडा उशीर झाला असून, संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून १५ जूनपर्यंत व्यापतो.
महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर तो वेगाने वाटचाल करणार असून, १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. राज्यात १२जूनपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरु होण्याची शक्यता असून, पुणे जिल्हा वनाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या १४ तासांत कोकण, गोव्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.मालवण ५६, रत्नागिरी ४९, गगनबावडा ३६, चंदगड, महाबळेश्वर ६ मिमी पाऊस पडला.
इशारा : १० जून रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.१२ जून रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १३ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.........११, १२ व १३ जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १२जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, पुणे, बीड, हिंगोलीतजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.