ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - आतापर्यंत पासपोर्ट न काढलेल्यांसाठी खुशखबर असून पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट फीमध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करत असताना आता 10 टक्के कमी फी भरावी लागणार आहे. मात्र ही कपात सर्वांसाठी नसून फक्त आठ वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांनाच याचा फायदा मिळणार आहे. इतरांना मात्र आधी होती तितकीच फी भरावी लागणार आहे.
सुषमा स्वराज यांनी अजून एक महत्वाची घोषणा केली असून यापुढे जारी करण्यात येणारे नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध असणार आहेत. याआधी पासपोर्ट फक्त इंग्रजी भाषेतच मिळत होते. पण पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीच माहिती ही इंग्रजीमध्येच असणार आहे.
All passports will be in English and Hindi languages from now on and not just Hindi: EAM Sushma Swaraj in Delhi pic.twitter.com/xG6ThKMgTT— ANI (@ANI_news) June 23, 2017
पासपोर्ट अॅक्ट लागू होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुषमा स्वराज यांनी एका स्टॅम्पचं अनावरण केलं. त्याचवेळी या दोन्ही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
डिसेंबर महिन्यात मोठ्या निर्णयाची घोषणा करत जन्मदाखल्याची अट शिथील करण्यात आली होती. तसंच घटस्फोट झालेल्या दांपत्यांना पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या पहिल्या पतीचं किंवा पत्नीच्या नावाची अर्जात नोंद करण्याची गरज नाही. तसंच साधू आणि संन्याशांना आपल्या आई - वडिलांऐवजी अध्यात्मिक गुरुचं नाव लिहिण्याची मुभा आहे.