पुणे : भारतात दरवर्षी न्युमोनियामुळे सुमारे १ लाख मुलांचा मृत्यू होतो. न्युमोसिल या लसीमुळे यापैकी ६० ते ७० हजार मुलांचे जीव वाचू शकतील, असा दावा सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत केला. सध्या आयात केल्या जात असलेल्या न्युमोनियावरील लसींच्या किंमतीपेक्षा या लसीची किंमत अर्ध्याहून कमी असेल, हेही त्यांनी अधोरेखित केले.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने न्युमोनियावर विकसित केलेल्या ‘न्युमोसिल’ या लसीचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत लसीबाबत माहिती दिली. यावेळी सिरमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पुनावाला, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजीव ढेरे आणि डॉ. विस्ताप्स सेठना उपस्थित होते. ते म्हणाले, न्युमोनियामुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका असतो, त्यामुळे आम्ही या मुलांचे मृत्यु रोखण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या लसीची पहिली मानवी चाचणी प्रौढ व्यक्तींमध्ये झाली. १२ ते २४ महिन्यांच्या मुलांमध्ये चाचणी झाल्यानंतर नवजात बालकांमध्ये चाचणी घेण्यात आली. भारतासह आफ्रिकन देशांमध्ये या चाचण्या झाल्या. सुमारे आठ वर्ष लसीवर संशोधन सुरू होते. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये भारतातील ७० ते ८० टक्के बालकापर्यंत ही लस पोहचलेली असेल. त्यासाठी केंद्र शासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच ही लस खासगी बाजारपेठेतही उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावी व युनिसेफशी या लसीसंदर्भात करार करण्यात आला आहे.-----------लस मिळेल २२० ते २२५ रुपयांतभारतात परदेशातून येणाºया लसीच्या किंमतीपेक्षा ही लस अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारकडून अडीच ते तीन कोटी लसीची मागणी केली आहे. ही लस साधारणपणे २२० ते २२५ रुपयांत दिली जाईल. सिरमची क्षमता प्राथमिक टप्प्यात सुमारे १० कोटी लसींची आहे. गावीसह युनिसेफ व इतर देशांनाही या लसीचा पुरवठा केला जाईल.----------
असा घ्यावा लागेल डोसलसीचे एकुण तीन डोस असतील. नवजात बालकांना पहिल्या महिन्यात पहिला डोस व त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने दुसरा डोस द्यावा लागेल. तर तिसरा डोस सहा महिन्यांच्या कालावधीने द्यावा लागेल. पुढील दोन ते तीन वर्षामध्ये मुलांची प्रतिकारशक्ती विकसित होईल. तसेच कुटूंंबियांतील इतर सदस्यांमध्येही या लसीमुळे सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. त्यामुळे या लसीचा फायदा संपुर्ण कुटूंबाला होऊ शकेल, असा दावा यावेळी करण्यात आला.----------न्युमोसिल ही लस आरएनए किंवा स्पाईक प्रोटीन स्वरूपाची नाही. यामध्ये पॉलीसॅक्राईड चा वापर अँटीजेन म्हणून आणि प्रोटीन वापर वाहक (कॅरिअर) म्हणून करण्यात आला आहे. लसीच्या विकसन प्रक्रियेला काँज्युकेशन प्रोसेस असे नाव देण्यात आले. त्यामुळे या लसीला न्युमोकोकल काँज्युकेटेड व्हॅक्सिन म्हटले जात आहे.-----------कोविशिल्डबाबत लवकरच ‘गुड न्युज’कोविशिल्डच्या चाचण्यांमधील निष्कर्षांचा सध्या सर्व पातळ््यांवर अभ्यास केला जात आहे. केवळ भारतातील नव्हे तर युकेसह अन्य देशांमध्ये झालेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांचीही पडताळणी केली जात आहे. लसीच्या सुरक्षेच्या कोणत्याही निकषांशी तडजोड केली जाणार नाही. सर्व निकषांची पुर्तता करून जानेवारी महिन्यात लसीबाबत ‘गुड न्युज’ दिली जाईल, असा दावाही अदर पुनावाला यांनी केला.