नवी दिल्ली : सीबीएसई परीक्षांबाबत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै या काळात होणार आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीत या परीक्षा होत असल्याने सरकारने परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ३२ लाख परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना स्वत:च्या जिल्ह्यात ही परीक्षा देता येणार आहे.
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा. तसेच, पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर सोबत आणावे. या निर्देशात असेही म्हटले आहे की, पालकांनी याची दक्षता घ्यावी की, विद्यार्थी आजारी नाही. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सीबीएसईने कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ २९ प्रमुख विषयांची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. यात उत्तर पूर्व दिल्लीत दंगलीमुळे स्थगित झालेल्या १७ प्रमुख विषयांच्या (दहावी ६ आणि बारावी ११) परीक्षांचा समावेश आहे, तर पूर्ण देशात १२ वीच्या केवळ १२ प्रमुख विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात येतील.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सीबीएसईच्या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, आता एक सूचना जारी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना स्वत:च्या जिल्ह्यात सीबीएसई बोर्डाची परीक्षा देता येणार आहे, असे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन रमेश पोखरियाल यांनी याबाबत माहिती दिली.
परीक्षार्थींना सीबीएससी परीक्षांसाठी दूरवरील परीक्षा केंद्रावर जाणे बंधनकारक होते. मात्र, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सरकारने गृहजिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षाची सोय केली आहे. त्यामुळे, पूर्वी ३००० केंद्रांवर होणारी परीक्षा आता १५००० केंद्रांवर होणार आहे.