नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यत 29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 6 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र एकीकडे कोरोनासारख्या महामारीचं संकट असताना पृथ्वीवरील ओझोन थरात एक मोठं छिद्र पडलं असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता ओझोन थरामध्ये पडलेलं छिद्र पूर्णपणे बुजलं असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
उत्तर ध्रुवावर आर्क्टिकवर ओझोन थराच मोठं छिद्र पडलं होतं. तसेच मागील महिन्यात या छिद्राने प्रचंड मोठा आकार घेतला होता. हे छिद्र दक्षिणी गोलार्धात पोहोचू शकेल अशी भीती देखील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता ते छिद्र पूर्णपणे बंद झाल्याचं कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने सांगितलं आहे. तसेच लॉकडाऊनमुळे हे छिद्र बंद झालं असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
शास्त्रज्ञ म्हणाले की, लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या प्रदूषणाचा यामध्ये काहीही संबंध नाही. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचं तापमान वाढू लागतं. त्यामुळे स्ट्रॅटोस्फेरिक थर गरम होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतं. यामुळे ओझोन थरावरील छिद्र बंद झालं असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs)मुळे या थराचं नुकसान होत होतं. फ्रिज, एसी, फोम आदींमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतो. 1985मध्ये दक्षिण ध्रुवावर ओझोनच्या थराला मोठं छिद्र पडल्याचं दिसून आलं होतं. 1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा करार आकाराला आला. यामध्ये उद्योगांनी पर्याय शोधण्याचं मान्य केलं. 180 देशांनी या करारावर सह्या केल्या होत्या. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचं मान्य केलं. 2000पासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: ...म्हणून आता भारताकडूनच जगाला आस; कोरोना लसीच्या निर्मितीचा विश्वास
देशात १६ मेनंतर एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही; वैद्यकीय व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांचा दावा
किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा