चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी समीकरणांची जुळवा-जुळव सुरू केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना खूश करण्यासाठी मनोहर लाल खट्टर यांनी विमा योजनासह अनेक घोषणा केल्या आहेत. व्यापाऱ्यांना आता मुख्यमंत्री वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी व्यापाऱ्यांना जीएसटीद्वारे नोंदणी करणे गरजेचे असणार आहे.
हरियाणातील एक मजबूत वोट बँक मानल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यासांठी मनोहर लाल खट्टर यांनी दोन नवीन योजना सुरु केल्या आहेत. राज्यातील व्यापाऱ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा योजनेसोबत व्यापारी क्षतिपूर्ति योजना बुधवारपासून लागू केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास व्यापाऱ्यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. याचबरोबर, व्यापाऱ्यांसाठी 5 ते 25 लाख रुपयापर्यंत नुकसानीसाठी क्षतिपूर्ति विमा योजना सुरु केली आहे.
राज्यात 3 लाख 13 हजार फर्म जीएसटी नोंदणी आहे. राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी युनायटेड इंडिया कंपनीकडून दोन विमा योजना घेतल्या आहेत. या दोन योजनांसाठी राज्य सरकार वर्षाला प्रीमियम जवळपास 38 कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा विमा मोफत होणार आहे, असे मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले. दरम्यान, सध्याच्या स्थितीत हरयाणातील 4 लाख जीएसटी नोंदणी व्यापाऱ्यांना पाच लाख रुपयांचा अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.