मुंबई :भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आता प्रवासादरम्यानचे सामान घरातून थेट ट्रेनच्या रेल्वेच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेची ही सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखवर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय रेल्वे नेहमी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून प्रवाशांचे सामान रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाने आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा सामान उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वप्रथम ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्याचे ध्येय असल्याचे सांगण्यात आले आहे.
अॅपच्या माध्यमातूनही सेवेचा लाभ
विशेष बाब म्हणजे केवळ प्रवासामधील सामानच नाही तर एखादी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून पार्सल म्हणून पाठवायची असल्यास ही सेवा वापरात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage च्या अॅपच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
सामानाप्रमाणे शुल्क आकारणी
नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना आपल्या रेल्वे आरक्षण आणि सामानाची माहिती द्यावी लागणार आहे. प्रत्यक्ष ट्रेन निघण्यापूर्वी चार ते पाच तास आधी प्रवाशांच्या घरून सामान घेऊन थेट सीटपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या सेवेसाठी सामानाचा आकार आणि वजनाप्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहे.
सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची काळजी
विमानतळांवरील सामानाप्रमाणे रेल्वेच्या सामानावरही बारकोड स्टीकर लावले जाणार आहेत. हे बारकोड स्कॅन करून प्रवाशांना सामान नेमके कुठे आहे, याची माहिती मोबाइलवर मिळणार आहे. कोरोना संकटामुळे सामानाचे सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेलाही आर्थिक फायदा होणार आहे, असे सांगितले जात आहे.