नवी दिल्ली - आगामी काळात रेल्वेचं तिकीट आरक्षण अधिक सुलभ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यांपासून रेल्वेत आरक्षित जागेसाठी 4 लाखांपेक्षा जास्त बर्थ सीट वाढणार आहेत. त्यासाठी, रेल्वेकडून एक भन्नाट आयडिया लढविण्यात आली आहे. त्यानुसार, रेल्वे डब्ब्यातील लाईट आणि एअर कंडिशनरसाठी स्वतंत्रपणे जनरेटर डब्बा लावण्याची गरज भासणार नाही. केवळ इंजिनच्या माध्यमातून ही गरज पू्र्ण होणार आहे.
देशातील रेल्वेचं जाळ भारतभर पसरला आहे. या रेल्वेतूत दररोज कोट्यवधी भारतीय प्रवास करतात. जागेचं आरक्षण न मिळाल्याने कित्येकदा प्रवास उभारुन किंवा जनरल डब्ब्यातून करावा लागतो. त्यावर, एक उपाय म्हणून रेल्वेनं आणखी बर्थ सीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, रेल्वेगाडीला लागणाऱ्या वीजेची निर्मित्ती दुसऱ्याच मार्गाने करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीला स्वतंत्र इंजिन लावण्याची गरज भासणार नाही. लिंक हाफमॅन बुश (एलएचबी) डब्बे असणाऱ्या प्रत्येक गाडीत एक किंवा दोन जनरेटर बोगी लावण्यात येतात. या जनरेटर बोगीतून रेल्वेतील प्रवाशांच्या सोयीसाठी वीजपुरवठा केला जातो. त्यावर, लाईट्स, एअर कंडिशनर आणि इतरही वीजेची उपकरणं चालतात. एन्ड अँड जनरेशन (ईओजी) या नावाने यास ओळखले जाते. मात्र, लवकरच जगभरात प्रसिद्ध हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणालीचा वापर भारतीय रेल्वे करणार आहे. या तंत्रज्ञानानुसार रेल्वेगाडीच्या वरुन जाणाऱ्या वीजेच्या तारांपासून रेल्वेतील डब्ब्यासाठी वीज वापरली जाते.
ऑक्टोबर 2019 पासून भारतीय रेल्वेचे जवळपास 5000 डब्बे एचओजी प्रणालीनुसार सुरू होणार आहेत. त्यामुळे रेल्वेतील जनरेटर बोगी हटविण्यात येतील. त्याजागी अतिरिक्त डब्बे लावले जाऊन जवळपास 4 लाख बर्थ सीटची संख्या वाढणार आहे. यासोबतच, रेल्वेच्या इंधनावार होणारा वार्षिक 6 हजार कोटींचा खर्चही वाचणार आहे. दरम्यान, सध्या चाचणी परिक्षणसाठी शताब्दी एक्सप्रेसमध्ये दोन जनरेटर बोगी लावण्यात येत असल्याचे रेल्वेच्या संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले.