नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून देशामध्ये मंदीचे वारे सुरू झाले आहेत. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आलेली आहे. अशा निराशेच्या वातावरणात बेरोजगारांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. जॉब पोर्टल शाइन डॉट कॉमने एक सर्व्हे केला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये विविध क्षेत्रातील कंपन्या मध्यम श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. आयटी, शिक्षण, आरोग्य, एफएमसीजीसह अन्य क्षेत्रांमध्ये भरतीमध्ये वाढ होणार आहे.
सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ज्यांच्याकडे 3 ते 6 वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. या अनुभवाचे कर्मचारी जर पगार आणि चांगल्या संधीच्या तयारीत आहेत, त्यांना अन्य कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होणार आहे.
शाईन डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जायरस मास्टर यांनी सांगितले की, अशा कंपन्यांची संख्या वाढत जात आहे, ज्या त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी मध्यम श्रेणीतील कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. केवळ उद्योगाच्या कामाला सरावलेले असतील असे उमेदवार कंपनीला नको आहेत, तर नवीन अननुभवी उमेदवारांना प्रशिक्षित व नियोजन करतील आणि त्यांच्या कामाचा उपयोग करून घेतील.
सर्व्हेमध्ये सहभागी 41.04 टक्के कंपन्यांनी सांगितले की ते अननुभवी लोकांची भरती करणार आहेत. याचा अर्थ नुकतेच पदवी मिळविलेल्या लोकांनाही मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर अर्ध्या कंपन्यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिण भागामध्ये कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.