लेह : भारतीय सुरक्षा दले दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी येथे सांगितले. दक्षिण काश्मिरातील बारामुल्लामध्ये ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या छावण्यांवरील रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी राजनाथसिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली. बारामुल्लातील या हल्ल्यात एक जवान शहीद, तर दुसरा एक जखमी झाला आहे. राज्यात सुरक्षा दलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत विचारले असता, ‘आमची सुरक्षा दले चोख प्रत्युत्तर देत आहेत,’ असे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केल्यानंतर, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेला हा पहिला मोठा हल्ला आहे. या हल्ल्याच्या १५ दिवस आधी दहशतवाद्यांनी येथून १०२ कि. मी. अंतरावरील उरी येथे लष्करी ब्रिगेडच्या मुख्यालयावर हल्ला केला होता, यात १९ जवान शहीद झाले होते. 1गृहमंत्री काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी विविध वर्गातील लोकांशी चर्चा करून, त्यांचे विचार ऐकून घेण्याच्या उद्देशाने, लेह आणि कारगिलच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. लद्दाखच्या दौऱ्याच्या उद्देशाची पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर सिंह म्हणाले की, ‘लोकांशी चर्चा करून या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. 2या भागातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. काश्मिरात हिंसाचार सुरू झाल्यापासून गृहमंत्र्यांचा हा चौथा दौरा आहे. या पूर्वी ते ४ व ५ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्याच्या दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी, २३, २४ जुलै आणि २४ व २५ आॅगस्टला त्यांनी राज्याचा दौरा केला होता.’
दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर - राजनाथ सिंह
By admin | Published: October 04, 2016 3:47 AM