नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. यावेळीही गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे.
31 डिसेंबर हा दिवस 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरात 2019 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गुगलने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केले आहे. गुगलने या डुडलमध्ये फुगे आणि पॉपकॉर्नसोबत नवीन वर्षाच्या स्वागताची वाट पाहणारी दोन अॅनिमेटेड हत्तीची पिल्लं दाखवली आहेत. तसेच घड्याळ देखील आहे ज्यामध्ये 11:55 अशी वेळ दाखवण्यात आली आहे. डुडलमधील निळ्या रंगाची छोटी पिल्लं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून फुग्यासोबत खेळताना तसेच आनंद लुटताना दिसत आहे.