नवी दिल्ली - महान समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांचा आज 246वा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनी गुगलनं विशेष डुडल बनवले आहे. आधुनिक भारताचे जनक म्हणून देखील राजा राममोहन रॉय यांना ओळखले जायचे. राजा राममोहन रॉय यांनी 19व्या शतकात सामाजिक सुधारणांसाठी अनेक मोठमोठी आंदोलनं केली होती. यामध्ये मुख्यतः सती प्रथा थांबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनं खास डुडल साकारुन समाज सुधारणेत त्यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाला सलाम केला आहे.
बीना मिस्त्री यांनी हे गुगल डुडल साकारलं आहे. बीना या टोरॅन्टो येथील डिझायनर आहेत. गुगल डुडलमध्ये राजा राममोहन रॉय हातात पुस्तक घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत. शिवाय त्यांच्या शेजारी काही माणसंदेखील आहेत. 22 मे 1772 रोजी राजा राममोहन रॉय यांचा जन्म पश्चिम बंगाल येथे झाला होता. कट्टर हिंदू रितीरिवाज आणि मूर्ती पूजेविरोधात त्यांनी लहानपणापासूनच आवाज उठवण्यास सुरुवात केली होती.
सती प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली. विधवा विवाह आणि संपत्तीच्या हक्कांसाठी समाजात जनजागृती करण्याचंही त्यांनी कार्य केले.