नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या कार्याला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून त्याबाबत माहिती देतं. गुगलने आज एक खास डुडल तयार करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आपल्या अभिजात सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री, स्वप्नसुंदरी मधुबाला यांची आज 86 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने मधुबाला यांचं मनमोहक डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे.
14 फेब्रुवारी 1933 रोजी मधुबाला यांचा जन्म झाला. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी आहे. दहा वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये मधुबाला यांनी रसिकांना वेड लावले. अभिनय सम्राट दिलीप कुमारपासून तर किशोरकुमारपर्यंत सगळेच त्यांच्यावर फिदा होते. गुगलने एक खास डुडल तयार करून मधुबाला यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने मधुबाला यांचे नृत्य करत असतानाचे खास डुडल तयार केले आहे.
बेबी मुमताज म्हणूनही मधुबाला यांना ओळखले जायचे. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्यांचे मधुबाला यांच्यावर विशेष प्रेम होते. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे मधुबाला असे नामकरण केले होते. मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. त्यांना एकूण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला यांच्यावर त्यांच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. मधुबाला या खूप भावनिक होत्या. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीच पार्टी किंवा प्रीमिअरमध्ये दिसल्या नाहीत. वडिलांचा प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी शेवटचा असायचा. 23 फेब्रुवारी 1969 रोजी अवघ्या 36 व्या वर्षी मधुबाला यांचं निधन झालं.
नवव्या वर्षी केलं चित्रपटात काम
मधुबाला यांनी वयाच्या नवव्या वर्षी चित्रपटात काम केलं होतं. 1942 मध्ये आलेल्या 'बसंत' या चित्रपटात मधुबाला यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती. त्यावेळी त्या नऊ वर्षाच्या होती. तर अभिनेत्री म्हणून 1947 मध्ये नीलकमल या चित्रपटात त्या पहिल्यांदा झळकल्या होत्या.
दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम, किशोर कुमार यांच्याशी लग्न
ज्वार भाटा चित्रपटावेळी मधुबाला यांची भेट दिलीप कुमार यांच्याशी झाली होती. दिलीपकुमार यांना पाहताच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम करू लागल्या होत्या. मुगल-ए-आझम या चित्रपटवेळी त्यांचे प्रेम फुलले. दिलीप कुमार यांच्यासह लग्न करण्याची मधुबाला यांची इच्छा होती. मात्र दिलीप कुमार यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासोबत मधुबाला यांचे लग्न झाले.