नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. यावेळी ही गुगलनेशिक्षक दिनाचे औचित्य साधून खास डुडल तयार केले आहे. शिक्षण हे कधीच संपत नाही. आपल्या आयुष्याला आकार देण्याचं महत्वाचं काम शिक्षक करत असतात. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे रंग भरणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. गुगलचं हे डुडल अॅनिमेटेड असल्यामुळे जगभरातील शिक्षकांसाठी ती गुगलच्यावतीने एक खास भेट आहे.
शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी गुगलने तयार केलेल्या या डुडलमध्ये GOOGLE या अक्षरांमध्ये G हा एक ग्लोब दाखवण्यात आला आहे. हा ग्लोब थोडा वेळ फिरत राहील्यानंतर थांबतो. त्याला एक चष्माही लावण्यात आला आहे ज्यामुळे तो एखाद्या शिक्षकाप्रमाणेच भासतो. ग्लोब जेव्हा फिरून थांबतो तेव्हा त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळ या विषयांशी संबंधित काही सांकेतिक चिन्हे बाहेर येतात.
5 सप्टेंबरला हा दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. 1962 मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा लोकांनी 5 सप्टेंबर हा दिवस राधाकृष्णन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राधाकृष्णन यांनी या निर्णयाला विरोध केला. याऐवजी दरवर्षी शिक्षक दिन साजरा करू असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.