नवी दिल्ली - गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्त्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत असतं. भारताचे महान तबलावादक 'पंडित लच्छू महाराज' यांची आज 74 वी जयंती आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत गुगलने विशेष कलात्मक डुडल तयार करून त्यांना सलाम केला आहे.
लच्छू महाराज यांचं खरं नाव लक्ष्मण नारायण सिंह असे आहे. उत्तर प्रदेशमधील बनारसमध्ये 16 ऑक्टोबर 1944 रोजी त्यांचा जन्म झाला. लच्छू महाराज यांनी तबलावादनाने देश विदेशात नावलौकीक मिळवला आहे. तसेच बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी तबलावादन केले आहे. लच्छू महाराज यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब दिला होता. मात्र ‘कोणत्याही कलावंतासाठी रसिकांनी टाळ्या वाजवून दिलेली दाद हाच मोठा सन्मान आहे,’ असं सांगून त्यांनी हा किताब नाकारला होता.
लच्छू महाराज यांच्या वडिलांचे नाव वासुदेव महाराज असे होते. तसेच लच्छू महाराजांना 11 भावंड होती. त्यांचं संपूर्ण कुटुंबच संगीतप्रेमी होतं. लच्छू महाराजांनी वडिलांकडून तबलावादनाची कला आत्मसात केली. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी स्टेज परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अल्पवधीतच ते 'तबला जादुगार' या नावाने लोकप्रिय झाले. 1957 मध्ये लच्छू महाराज यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कराने गौरवण्यात आले आहे.