नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. गुगलने यावेळी भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना डुडलरुपी सलाम केला आहे. आज डॉ. विक्रम साराभाई यांची शंभरावी जयंती आहे. या निमित्ताने गुगलने एक खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात 12 ऑगस्ट 1919 रोजी झाला होता. तो पारतंत्र्याचा काळ होता व स्वातंत्र्याची चळवळ जोम घेऊ लागली होती. विक्रम यांच्या कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होते, त्यामुळे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री, मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, सी.एफ.अँड्रूज; या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीची त्यांच्या घरी ऊठबस होत असे. या थोर व्यक्तीच्या सहवासाचा नि विचारांचा तरुण विक्रम यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला.
विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. त्यांचे पुढचे शिक्षण गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर, ते इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते 1939 साली रसायन आणि भौतिक या विषयातील ट्रायपास परीक्षा उतीर्ण झाले. डॉ. विक्रम साराभाई यांनी देश-विकासासाठी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी अचंबित करणारी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नाना संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, तिरुअनंतपूरचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, अहमदाबादमधील त्यांच्या स्वत:च्या सहा संस्थांचे विलीनीकरण करून उभारलेले स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, कल्पकम येथील फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर, कोलकोतातील व्हेरियबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बिहारमधील जादूगुडा येथे उभारलेली युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया इ. संस्थाच्या निर्मितीत ते आघाडीवर होते. अशाप्रकारे त्यांनी सुरू केलेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली. 30 डिसेंबर 1971 रोजी तिरुअनंतपुरम येथे वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.