मुंबई- कायद्याची पदवी घेणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला आणि ब्रिटिश विद्यापिठात शिकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असे सन्मान मिळवणाऱ्या कार्नेलिया सोराबजी यांचा आज 151 वा जन्मदिन. यानिमित्त गुगलनेही डूडलमार्फत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.कार्नेलिया सोराबजी यांचा जन्म 1866 साली तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये असणाऱ्या नाशिकमध्ये झाला. त्यांचे वडील रेव्हरंड सोराबजी कर्सेदजी आणि आई फ्रॅंकलीन फोर्ड यांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले होते. तसेच या दोघांनी पुण्यामध्ये शाळांचीही स्थापना केली होती. त्यामुळेच कार्नेलिया सोराबजी यांनाही शिक्षण घेण्यासाठी घरातूनच प्रेरणा आणि मदत मिळाली होती. कार्नेलिया यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला आणि या विद्यापिठातून पदवी प्राप्त करणारी पहिली महिला असा किताबही त्यांनी मिळवला.
ऑक्सफर्ड प्रवेशाची तयारीमुंबई विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कार्नेलिया यांनी ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयारी केली मात्र तेव्हा मुलींना प्रवेश देण्यासाठी विद्यापिठे फारशी उत्सुक नसत. त्यामुळे कार्नेलिया यांच्या प्रवेशासाठी नॅशनल इंडियन असोसिएशनला प्रयत्न करावे लागले होते. तसेच त्यांच्या ब्रिटिश मित्र-मैत्रिणींनीही ऑक्सफर्डच्या सोमरविल कॉलेजात कायद्याची परीक्षा देण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.1894 साली कार्नेलिया यांनी कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण विद्यापिठाने त्यांना पदवी दिली नव्हती. कारण ऑक्सफर्डने पदवीदानाची पद्धती त्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे 1922 साली सुरु केली.
Today is 151st birth anniversary of Cornelia Sorabji.First female to practice law in India and Britain, the first woman to be graduated from Bombay University, and also the first Indian national to study in Oxford pic.twitter.com/Ztn2rxwPpd— Mumbai Heritage (@mumbaiheritage) November 15, 2017
भेदभाव कायम कायद्याचे शिक्षण घेऊनही स्त्री-पुरुष हा भेदभाव नंतरही कायमच राहिला. कार्नेलिया यांना इंग्लंडमधील कोर्टात काम करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना भारतात येऊन विधि सल्लागार व्हावे लागेल. भारतात त्यांनी महिलांना मदत करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापिठात एलएलबी पदवीसाठी पुन्हा प्रवेश घेतला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाची प्लीडर परीक्षाही त्या पास झाल्या मात्र तरीही त्यांना बॅरिस्टर म्हणून मान्यता मिळाली नाही. 1923 साली महिलांना ब्रिटिशांनी वकिली करण्याची परवानगी दिली. त्यानंतर सोराबजी कलकत्त्यात वकिलीस सुरुवात केली. सहा वर्षांनी निवृत्त झाल्यावर त्या लंडनमध्ये राहण्यासाठी गेल्या व 1954 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आपल्या आठवणींवर आधारीत त्यांनी दोन आत्मचरित्रेही प्रसिद्ध केली.