उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली, भीषण अपघात झाला आहे. कंटेनरने नैनितालहून परतणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतरकार लॉक झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ कारमध्ये अडकून राहिल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नैनितालवरून घरी परतणाऱ्या चार जणांच्या कारला सिमेंट पाईपने भरलेल्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात सिमरन आणि शिवानी यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल आणि संजू गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्री १२ वाजताच्या सुमारास दिल्ली-लखनऊ महामार्गावर हा भीषण अपघात घडला.
भीषण अपघाताबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, कार चालक गुगल मॅप्सद्वारे दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करत असताना, मुरादाबाद बायपासकडे वळताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. अपघातादरम्यान, कार लॉक झाल्यामुळे दोन तरुण आणि दोन तरुणी गाडीत अडकले होते. या अपघातात दोन्ही मुलींचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एसपी सिटी मुरादाबाद कुमार राम विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील चार जण नैनितालहून हरियाणातील रोहतकला परतत होते. एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली, तेव्हा शिवानी आणि सिमरन नावाच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आणि दोन तरुण जखमी झाले. पोस्टमॉर्टमनंतर मुलींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. गुगल मॅप सुरू होतं आणि शॉर्टकट रस्ता दाखवत असल्याने कार चुकीच्या बाजूने चालवली गेली. गुगल मॅपने धोका दिल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.