Google Map Wrong Route : गेल्या काही काळापासून Google Map मुळे रस्ता चुकल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका कुटुंबाने गुगल मॅपच्या मदतीने उज्जैनहून गोव्याचा प्रवास सुरू केला. पण, गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे, हे कुटुंब थेट कर्नाटकच्या घनदाट जंगलात अडकले. दोन पुरुष आणि दोन महिलांना रात्रभर या जंगलात राहावे लागले.
अन्न-पाणी नाही, नेटवर्क नाही; घनदाट जंगलात काढली रात्र उज्जैनवरुन गोव्याचा प्रवास सुरू करणाऱ्या कुटुंबाला तांत्रिक बिघाडामुळे गुगल मॅपने शिरोली जंगलाच्या आत निर्जन आणि चुकीच्या वाटेवर नेले. वाटेत ना कोणती वस्ती होती, ना मोबाईल नेटवर्क होते. जंगलात खूप आत गेल्यावर त्यांना रस्ता चुकल्याचे समजले. रस्ता माहित नसल्यामुळे कुटुंब ना पुढे जाऊ शकत होते, ना मागे परत फिरू शकत होते. परिस्थिती इतकी बिकट झाली की, त्यांना रात्रभर त्या घनदाट जंगलात बसून राहावे लागले.
पोलिसांनी कुटुंबाची जंगलातून सुखरूप सुटका केलीघाबरलेल्या आणि असहाय अवस्थेत त्यांनी गुरुवारी सकाळी चार किलोमीटर पायी चालत नेटवर्क मिळवले आणि आपत्कालीन सेवेच्या 112 क्रमांकावर फोन केला. कुटुंबीयांचा फोन आल्यानंतर खानापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना मदत केली. सहाय्यक उपनिरीक्षक के.आय. बडिगर आणि अधिकारी जयराम हणमनावार यांनी या कुटुंबाचा शोध घेतला आणि घनदाट जंगलातून 31 किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर त्यांना जंगलातून बाहेर काढले, अन्न-पाणी दिले आणि गोव्याचा योग्य मार्ग दाखवला.
यापूर्वीही अशा धोकादायक घटना घडल्या आहेतगुगल मॅपच्या चुकीने लोकांना अडचणीत टाकण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात Google Maps ने उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका अपूर्ण पुलाची दिशा दाखवली, ज्यामुळे पुलावरुन कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेशिवाय देशभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. तंत्रज्ञानावरील अंधश्रद्धा धोकादायक ठरू शकते, हे या घटनांवरून दिसून येते.