नवी दिल्ली : चुकीच्या बातम्यांना पत्रकार बळी पडू नयेत यासाठी गुगल इंडिया भारतातील 8000 पत्रकारांना येत्या वर्षभरात प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये इंग्रजीसह इतर सहा भाषांमध्ये पत्रकारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गुगल न्यूज इनिशिएटिव्ह इंडिया ट्रेनिंग नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील प्रमुख शहरांतील 200 पत्रकारांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये पाच दिवसांच्या इंग्रजी आणि सहा इतर भारतीय भाषांकरिता आयोजित केल्या जाणाऱ्या या कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल, या प्रशिक्षणांमध्ये त्यांचे कौशल्य सुधारले जाईल. याचबरोबर, प्रमाणित प्रशिक्षक या नेटवर्कमाध्यामातून आयोजित दोन-दिवसीय, एक-दिवसीय आणि अर्धवेळ कार्यशाळेत अधिक पत्रकारांना प्रशिक्षण देतील. दरम्यान, गुगल इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि कन्नड या भाषांमध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा संपूर्ण भारतात आयोजित केली जाणार आहे.
या प्रशिक्षणाचा एकच उद्देश आहे की, सत्य घटनेची चौकशी आणि ऑनलाइन पडताळणी असा असणार आहे. यासाठी फर्स्ट-ड्राफ्ट, स्टोरीफूल, ऑल्टन्यूज, बुमलाईव्ह, फॅक्टचेकर डॉट इन आणि डेटालाईडच्या तज्ज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम या प्रशिक्षणात वापरण्यात येणार आहे. विश्वसनीय आणि अधिकृत मीडिया स्रोतांचे समर्थन करणे गुगलसाठी प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे भारतामध्ये चुकीच्या माहितीच्या विरोधात त्यांच्या लढ्यात पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इंटरन्यूज, डेटालाईड्स आणि बूमलाईव्ह करत असलेल्या सहयोगचा आम्हाला अभिमान वाटतो, असे गुगलने म्हटले आहे.