वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेली एक एफआयआर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १८ जणांमध्ये एक नाव असे आहे ज्याची सर्वाधिक चर्चा आहे. हे नाव आहे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे. सुंदर पिचई यांच्याविरोधात आयटी अॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही एफआयआर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली आहे. वारासणीमधील गौरीगंज परिसरात राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी ही एफआयआर नोंदवली आहे. गिरिजा शंकर यांचा आरोप आहे की व्हॉट्स अॅपच्या एका ग्रुपवर एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी त्या क्रमांकावर फोन करून व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर यूट्युबवर एक व्हिडीओ अपलोड केला गेला. ज्यामध्ये कथितपणे गिरिजा शंकर यांचा मोबाईल क्रमांक शेअर करण्यात आला. तेव्हापासून गिरीजा शंकर यांना धमक्या देणारे फोन येत आहेत.गिरीजा शंकर यांचा मोबाइल क्रमांक यूट्युबवर अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव विशाल सिंह आहे. त्याने यूट्युबवर एक व्हिडिओ तयार केला आणि गिरिजा शंकर यांचा मोबाइल क्रमांक त्या व्हिडीओमध्ये टाकून या व्यक्तीपासून आपल्याला धोका असल्याचे एक गाणे तयार केले. तेव्हापासून गिरिजा शंकर यांना सुमारे ८ हजार ५०० धमकीचे फोन आले आहेत. यामधून जीवे मारण्याची धमकी आणि शिविगाळ केली जात आहे.त्यानंतर गिरिजा शंकर यांनी या प्रकरणी न्यायालयात कलम १५६ अंतर्गत विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने भेलूपूर पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करून तपासाचे आदेश दिले. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी भेलूपूर पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या १८ जणांमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यासह गुगलच्या अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर आय़टी अॅक्ट आणि कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस घेताहेत शोध, हे आहे कारण
By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 8:10 AM
FIR against Google's CEO Sundar Pichai : एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १८ जणांमध्ये एक नाव असे आहे ज्याची सर्वाधिक चर्चा आहे. हे नाव आहे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे.
ठळक मुद्देही एफआयआर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली आहेवारासणीमधील गौरीगंज परिसरात राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी ही एफआयआर नोंदवली आहे १८ जणांमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यासह गुगलच्या अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे