देशभरात अनेक अजब घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बिहारमध्ये पोलिसांनी कार मालकाला १००० रुपयांचा दंड ठोठावला. पण त्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गाडी चालवताना कार चालकाने हेल्मेट घातलं नसल्याने दंड ठोठावल्याचं कारण दिलं आहे. कार मालकाला मोबाईलवर दंड भरण्याचा मेसेज आल्यावर धक्काच बसला. कार मालकाने वाहतूक विभागापासून ते पोलिसांपर्यंत अनेकांना भेटून याबाबत तक्रार केली.
मांझा पोलीस स्टेशन हद्दीतील भोजपुरवा येथील रविशंकर नाथ तिवारी यांचा मुलगा मुरारी कृष्णा उर्फ बिट्टू याची स्विफ्ट डिझायर कार आहे. जिचा नंबर BR २८Y ९२२४ आहे. १ एप्रिल २०२४ रोजी दुपारी त्याच्या मोबाईलवर दंड आकारल्याचा मेसेज आला. मेसेज पाहताच त्याला धक्काच बसला, कारण त्यावेळी त्याची कार घराच्या बाहेरच उभी होती. त्याने मेसेज वाचला तर त्यामध्ये त्याला बाईकचा फोटो दिसला.
गोपालगंज-सिवान रोडवरील मानिकपूर कपरपुरा वळणावर वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी हा दंड ठोठावला. यानंतर कार चालकाने ट्रॅफिक पोलिसांची आणि अनेक अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तेव्हा त्याला दंड भरू नका, आपण यामध्ये काहीतरी तोडगा काढू असं उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. मात्र आता सहा महिने झाले तरी काहीही झालेलं नाही. न्यूज १८ हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.