नवी दिल्ली : लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कायम जमिनीशी जोडलेले होते. संघर्ष व साहसाचे ते अद्भुत रसायन होते. हा नेता गरीब, दलित, शेतकरी यांचा राष्ट्रीय आवाज होता, बहुजनांचा नेता म्हणून ते विख्यात होते, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावना व्यक्त केल्या.गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्ताने गुरुवारी डाक पाकिटाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम दुपारी एक वाजता गोपीनाथ गड, परळी येथे झाला. गोपीनाथ मुंडे यांनी जवळपास पाच दशके समाजकारण आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण आणि समाजकारणातल्या योगदानासाठी त्यांच्या स्मरणार्थ डाक पाकीट व तिकीट कॅन्सलेशन तिकिटाचे अनावरण झाले. या कार्यक्रमात जे. पी. नड्डा व्हर्च्युअल पद्धतीने नवी दिल्ली येथून उपस्थित होते.नड्डा म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे लोकनायक होते. त्यामुळे आजच्या तिकीट आवरणातून त्यांचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील विविध पदांना दिलेल्या न्याय आणि केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री पदापर्यंतचा प्रवास अद्भुतच राहिला आहे. डाक विभागाने त्यांच्या पाकिटाचे अनावरण करून त्यांच्या स्मृती जागवल्या, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मुंडे खऱ्या अर्थाने नव्या विचारांचे धनी होते. त्यांनी महिलांना विमा संरक्षण दिले, ऊस कामगारांसाठी महामंडळे स्थापली, झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. त्यांचे काम जर खरेच लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर नेत्यांना, कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन काम करायला हवे. यावेळी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे व रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमात सहभागी झाले होते. परळीतील गोपीनाथ गडावरून माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, राज्यसभेतील खासदार भागवत कराड हे सहभागी झाले होते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी, कष्टकऱ्यांचा राष्ट्रीय आवाज; जे. पी. नड्डा यांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 9:34 AM