अलाहाबाद, दि. 18 - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झालेल्या बालमृत्यू प्रकरणामुळे योगी सरकारच्या अडचणी चारही बाजूंनी वाढताना दिसत आहेत. एकीकडे विरोधकांकडून योगी सरकारवर 'संवेदनाशून्य आणि अपयशी सरकार' असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारकडे बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले आहे. ऑक्सिजनअभावी मुलांचा मृत्यू झाल्याची बाब योगी सरकारनं फेटाळून लावली आहे. त्यामुळे बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झालेल्या बालमृत्यूमागे नेमके कारण काय आहे?, यावर अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
अलाहाबाद हायकोर्टात याप्रकरणी 29 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे बालमृत्यूप्रकरणी गुरुवारी लखनौमधील कोर्टात याप्रकरणी खटल्यासाठी अर्जदेखील दाखल करण्यात आला आहे. तक्रार करण्यात आलेल्या या अर्जात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्सचे संचालक मनिष भांडारी आणि ऑफिस हेड मिनू वालिया यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राहुल गांधी शनिवारी जाणार गोरखपूरमध्येगोरखपूरमध्ये 65 हून अधिक लहानग्यांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. हा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरला आहे. शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीदेखील शनिवारी (19 ऑगस्ट) बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला भेट देणार आहेत. या दौ-यादरम्यान राहुल गांधी योगी सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेनंतर गुलाम नबी आझाद आणि राज बब्बर यांसारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निष्काळजीपणाचा आरोप करत योगी सरकारवर हल्लाबोल चढवला होता.
गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये 65 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात नवजात बालकांची संख्याही मोठी आहे. मृत्यू झालेल्या 17 नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती. त्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांना रुगालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी या मुलांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.