गोरखपूर:उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गावात यज्ञ आणि कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आकर्षक करण्यासाठी हत्ती आणले होते. यावेळी अचानक हत्ती बिथरला आणि त्याने कार्यक्रमात तांडव केला. जो समोर येईल त्याला हत्तीने चिरडले, या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.
नदीच्या काठावर वसलेल्या दिहजवळ आयोजित यज्ञाला गावातील 5 ते 6 हजार लोक पोहोचल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी दोन हत्तींना आणल होते. गावातील महिला यज्ञानंतर हत्तीला प्रसाद खाऊ घालत होत्या, एक हत्ती बिथरला. त्याने कौशल्या देवी (50 वर्षे), त्यांचा चार वर्षांचा नातू कृष्णा आणि गावातील महिला कांती देवी (55 वर्षे) यांना चिरडून टाकले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.
हत्तीचे उग्र रूप पाहून तेथे गोंधळ उडाला. यानंतर हत्ती शेताकडे धावला. या घटनेबाबत गोरखपूरच्या एसडीएम सदर नेहा बंधू सिंह यांनी सांगितले की, दोन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. इतरही अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.