गोरखपूर, दि. 19- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोरखपूर दौऱ्याच्या आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. गोरखपूर सहलीचं ठिकाण नसल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. दिल्लीमध्ये बसलेले कुणी युवराज आणि लखनऊमध्ये बसलेले कोणतेही युवराज स्वच्छता अभियानाचं महत्त्व समजू शकत नाही. आम्ही उत्तर प्रदेशला पिकनिक स्पॉट बनविण्याची परवानगी देऊ शकत नाही. स्वच्छ आणि सुंदर उत्तर प्रदेश बनवायची गरज आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे.
गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'स्वच्छ यूपी, स्वस्थ यूपी' या मोहिमेची सुरूवात केली. यावेळी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. गोरखपूरमध्ये मुलांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेचा उल्लेख न करता त्यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. दिल्लीमध्ये बसलेले युवराज आणि लखनऊमधील कुणी पुत्र हे दुःख समजू शकत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. गोरखपूरच्या बीआरडी रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मुलांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या गोरखपूर दौऱ्यावर आदित्यनाथ टीका करताना दिसले. गोरखपूरला पिकनिक स्पॉट बनू देणार नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितलं.
गोरखपूरमधील या कार्यक्रमाच्या मंचावरून योगी आदित्यनाथ यांनी पूर्वीच्या सरकारवरही कडाडून टीका केली. गेल्या 12-15 वर्षात इथल्या सरकारने आपल्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करून उत्तर प्रदेशाला बर्बाद केलं आहे. आधीच्या सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे इथे आजारपण वाढलं आहे. उत्तर प्रदेशला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या सहभागाची गरज आहे. ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती स्वच्छता अभियानाला त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवेल त्या दिवशी उत्तर प्रदेश रोगमुक्त होईल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरच्या दौऱ्यावर आहेत. काहीवेळा पूर्वीच ते गोरखपूरमध्ये दाखल झाले. राहुल गांधींच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गोरखपूरमधील बीआरडी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार आहेत तसंच ते बीआरडी हॉस्पिटलमध्येही जाणार आहेत.