कोलकाता, दि. 26- 29 ऑगस्टरोजी पश्चिम बंगाल सरकारने बोलावलेल्या बैठकीसाठी गोरख जनमुक्ती मोर्चाचे नेते उपस्थित राहणार आहेत. प. बंगाल सरकारकडून चर्चेसाठी अधिकृत आमंत्रण आल्यानंतर गोरखा जनमुक्तीने आज हा निर्णय घेतला आहे.'आम्हाला काल रात्री चर्चेचे आमंत्रण मिळाले आहे आणि त्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आम्ही ठरवले आहे. गोरखा जनमुक्तीच्या ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ त्यासाठी उपस्थित राहिल. परंतु शिष्टमंडळात कोणकोणते सदस्य असतील हे अद्याप निश्चित केलेले नाही' असे गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते अमर सिंग राय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले. गोरखा हिल्स परिसरामध्ये परिस्थिती सुरळीत व्हावी यासाठी जीएनएलएफने प.बंगाल सरकारकडे चर्चेची विनंती केली होती. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी चर्चेसाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले. जर अधिकृत आमंत्रण आले तरच चर्चेला येऊ अशी अट गोरखा जनमुक्ती मोर्चाने ठेवली होती. आम्हाला आमंत्रण आलं आहे, त्यामुळे चर्चा करण्यास काहीच हरकत नाही असं गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते म्हणत आहेत.
चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?
गोरखालॅंड आंदोलनामुळे चहाच्या दराला उकळी
गोरखालॅंडच्या मागणीमुळे दार्जिलिंग अशांत आहे. चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा सिलिगुडी कॉरिडॉर येथे आहे. एका बाजूला सिक्किम राज्याची सीमा, दुसरीकडे भूटान, नेपाळ आणि एका बाजूस बांगलादेश असल्यामुळे या चिंचोळ्या पट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपुर्ण इशान्य भारताला जोडणाऱ्या या पट्टीवर आणि दार्जिलिंगमध्येच अशांतता निर्माण झाल्यामुळे गोरखालॅंडमुळे येथील प्रदेशाची सुरक्षा अधिकच नाजूक झालेली आहे. गोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. राष्ट्रीय महामार्ग 10 हा रस्ता सिक्कीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंदोलनामुळे सिक्कीमच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.