लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्दी आणि खाेकल्याची देशभरात साथ सुरू आहे. एच३एन२ हा विषाणू यास कारणीभूत असून लाेकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, तूर्त घाबरण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. भारतात या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केले.
कर्नाटक व हरयाणात या विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २ जानेवारी ते ५ मार्चपर्यंत देशात एच३एन२चे ४५१ रुग्ण आढळून आले आहेत. ‘आपण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्येत घट होण्याची अपेक्षा आहे’, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
डुकरांपासून संसर्गाची शक्यता
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार, एच३एन२ हा विषाणू मानवेतर असून डुकरांमार्फत तो मानवांना संक्रमित करतो. याची लक्षणे हंगामी फ्लूसारखीच असतात. यात ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यासह इतर लक्षणेदेखील असू शकतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"