नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चार राज्यांमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटत आला आहे. मात्र तरीही या चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा शपथविधी पुढे ढकलण्यामागचं कारण समोर आलं आहे.
या राज्यांमध्ये सत्तेवर आलेल्या भाजपामधील अनेक नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे. १७ मार्च रोजी होलाष्टक आहे. भारतीय रीती-रिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार होलाष्टक हे अशुभ मानले जाते.वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार होलाष्टकानंतरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यामध्ये भाजपा सरकार स्थापनेला हिरवा झेंडा दाखवू शकते.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, गोव्यामध्ये प्रमोद सावंत आणि मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे निश्चित आहे. मात्र उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र होलाष्टक संपल्यानंतर या चारही राज्यांमध्ये सरकारांचा शपथविधी होणार हे निश्चित आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित होऊनही अशुभ काळ असल्याने मुख्यमंत्र्यांच्या नावांची अधिकृत घोषणाही भाजपाकडून केली जात नाही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी होत असलेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.
होळीचा सण हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. योगी आदित्यनाथ यांचे विधानसभा क्षेत्र असलेल्या गोरखपूरमध्ये १९ मार्च रोजी होळीची समाप्ती होईल. तर गोव्यामध्ये अजून काही दिवस होळी खेळली जाते. त्यामुळे होळीच्या सणाची समाप्ती पाहून शपथग्रहणाची तारीख निश्चित केली जाईल. मणिपूरमध्ये होळीचा सण योगांस उत्सवासह खेळला जातो. तो पाच दिवसांपर्यंत चालतो. तो १५ व्या शतकातील संत चैतन्य महाप्रभूंच्या जयंती दिनी समाप्त होतो. त्यामुळे मणिपूरमध्ये आमदारांनी शपथ घेतली आहे. मात्र होळीच्या उत्सवानंतरच तिथे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.