नवी दिल्ली - २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या डब्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणातील एका दोषीला आज सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील दोषी फारुखला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या १७ वर्षांपासून तो तुरुंगात आहे. दरम्यान, सुप्रिम कोर्टाने गुजरात सरकराचा विरोध फेटाळून लावत फारूख याला जामीन मंजूर केला आहे. फारुखला पेटत्या डब्यावर दगडफेक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. फारुखने पेटत्या ट्रेनमधून प्रवासी बाहेर पडू नये, म्हणून दगडफेक केली होती.
सुप्रीम कोर्टाने सांगितले की, दोषी फारुख हा २००४ पासून तुरुंगात आहे. तो गेली १७ वर्षे तुरुंगात राहिला आहे. त्यामुळे त्याला तुरुंगातून जामिनावर मुक्त केलं जावं. दरम्यान, सुप्रिम कोर्ट या प्रकरणातील इतर १७ दोषींच्या अपिलांवर नाताळाच्या सुट्टीनंतर जानेवारीमध्ये सुनावणी करणार आहे.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या एका डब्याला जमावाने आग लावली होती. या भीषण आगीत ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये भीषण दंगे झाले होते.
सुप्रिम कोर्टाने जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिलेल्या दोषी फारुखवर दगडफेक आणि हत्येचा गुन्हा सिद्ध झाला होता. सुप्रिम कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान, फारुखच्या जामिनाला गुजरात सरकारने विरोध केला होता. फारुखवर गंभीर गुन्ह्याचा आरोप होता. त्याने दगडफेक करून लोकांना पेटत्या ट्रेनमधून बाहेर पडू दिले नव्हते, असा युक्तिवार गुजरात सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला होता.