नवी दिल्ली-
देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या एन्ट्रीमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्य सरकारांकडूनही कोरोना संदर्भात अॅडव्हायझरी जारी केली जात आहे. यातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी उच्चस्तरिय बैठक घेतली.
कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मंत्री मांडवीय यांनी अधिकाऱ्यांना नव्या व्हेरिअंटबाबत वेगानं तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जिनोम सीक्वेन्सिंगसाठी वेगानं प्रयत्न करण्याच्याही सूचना देण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेता नव्यानं रणनिती आखावी लागेल असंही मांडवीय म्हणाले.
राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला दिल्लीत कोरोनाचे ४२९ सक्रीय रुग्ण आहेत. यातील ३२९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र आणि केरळ राज्यानंही अॅडव्हायझरी जारी केली आहे. केरळमध्ये नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर मुंबईसारख्या गर्दीच्या शहरांमध्ये सणासुदीच्या काळात गर्दी होऊन आणि मोठ्या कार्यक्रमांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा निष्काळजीपणा बाळगणं धोकादायक ठरू शकतं.