नवी दिल्ली : आपल्या सरकारने भरती प्रक्रियेला पारदर्शक, निष्पक्ष बनविल्याने नोकऱ्यांतील भ्रष्टाचार व लागेबांध्यांची शक्यता संपुष्टात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. रोजगार मेळाव्यांतर्गत ७१ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मोदींच्या हस्ते मंगळवारी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. तेव्हा या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. भारत सरकारची प्रत्येक योजना आणि प्रत्येक धोरणामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.देशभरात ४५ ठिकाणी ‘रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या नियुक्त्या केंद्र सरकारच्या विविध विभागांत तसेच राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांमध्येही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्याचा आणि या महिन्यात आसाममध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, यातून भारत सरकार आणि भाजपशासित राज्य सरकारांची तरुणांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने पुढे कूच करणारा भारत आज विकसित भारत बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्टार्ट-अप्सनी किमान १० लाख तरुणांना रोजगार दिला आहे, असेही ते म्हणाले.
३० लाख पदे रिक्त असताना इव्हेंट : खरगे७१ हजार नियुक्तिपत्रांचे वाटप केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका केली. सरकारी खात्यांत ३० लाख पदे रिक्त असताना नियुक्तिपत्र वाटपाचा ‘इव्हेंट’ बनविण्यात आला, असे ते म्हणाले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत १८ कोटी तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा केला, असा आरोपही त्यांनी केला. मोदींनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाची पातळी आणखी खाली आणली असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.
तुम्ही रोजगार मेळा योजनेचे फायदे तुमच्या टुंबाव्यतिरिक्त इतर लोकांना सांगा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास सांगा. रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे पंतप्रधानांचे वचन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. - सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री