ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पुरस्कार परत करणे हे निष्फळ असून तसे करून तुम्ही सरकार व तुमच्यावर प्रेम करणा-या लोकांचा अपमान करता' असे सांगत ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आपण पुरस्कार परत करणार नसल्याचे स्पष्ट केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांच्या निषेधार्थ लेखक, कलाकार, वैज्ञानिक 'पुरस्कार वापसी' मोहिमेत उतरले आहेत मात्र कमल हसन यांना हा मार्ग योग्य वाटत नाही पुरस्कार परत करणे निष्फळ असल्याचे मत त्यांनी मांडले.
ज्यांनी ज्यांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते स्वीकारावेत आणि त्यांची भावना त्यांनी वेगळ्या प्रकारे व्यक्त करावी. ते एखादा चांगला सणसणीत लेख लिहू शकतात आणि आणखी जास्त चांगल्याप्रकारे लोकांचे लक्ष वेधू शकतात असं कमल हसन यांनी सांगितले.
असहिष्णूता म्हणाल, तर ती देशात १९४७ पासून सुरू आहे. असहिष्णूतेमुळे एकदा देशाची फाळणी झाली असल्याचे सांगत कमल हसन यांनी साहित्यिकांनीपण सहिष्णूतता दाखवायला हवी अशी गरज व्यक्त केली आहे. कुठलंही सरकार असो त्यांच्यावर टीका करायचा आपल्याला अधिकार आहे, ते करायलाच हवं, परंतु ते करण्याचे मार्ग वेगळे आहेत आणि त्यामध्ये पुरस्कार परत करण्याच्या मार्गाची गरज नाही. पुरस्कारवापसी हा राजकीय प्रेरणेने झालेला प्रकार आहे, का यावर त्यांनी तशी शक्यता व्यक्त केली आणि प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही राजकीय प्रेरणा असतात असे मत व्यक्त केले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत पुरस्कार परत केले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिऴविणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यासह दहा दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
मात्र ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना निषेधाचा हा मार्ग मान्य नाही. विरोधाचे इतरही मार्ग आहेत असे सांगत सहिष्णूता ही दोन्ही बाजूंनी असली पाहिजे, असे ते म्हणाले. याच असहिष्णूतेमुळे देशाचे विभाजन झाले होते, आता पुन्हा त्यामुळेच देशाचे तुकडे होऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.