नवी दिल्लीगुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर भाष्य केलं. गुजरातच्या कच्छ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचं म्हटलं. कृषी कायद्यांबाबतच्या शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णयदिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले. "तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का?", असा सवाल उपस्थित करत मोदींनी ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असं मोदी म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना या कायद्यासाठीची मागणी करत होते आणि आज विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.
"शेतकऱ्यांचं हित ही सरकारची प्राथमिकता असून त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी सरकारसोबत आहे. काहीजण गैरसमज निर्माण करुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण केलं जातंय", असा आरोप मोदींनी केला.
कच्छला दिली मोदींनी मोठी भेट"सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहारिनमध्ये ज्यापद्धतीनं एनर्जी पार्क आहे. त्या तोडीचा हायब्रिड एनर्जी पार्क कच्छमध्ये तयार होतोय.", असं मोदींनी सांगितलं. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.