ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - माजी सैनिकांसाठी असलेल्या ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेप्रती सरकार कटिबद्ध असून ती लागू होण्याबद्दल कोणालाही शंका नसावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.
सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाल्यानंतरही ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेची देशात अंमलबजावणी न केल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या मुलखतीदरम्यान मोदींनी त्याचा समाचार घेतला. ' काँग्रेस या (वन रँक वन पेन्शन) मुद्याचे राजकारण करत आहे. ते सत्तेवर असताना त्यांनी या योजनेसाठी काहीही काम केले नाही, त्यामुळे त्यांना या विषयावर काहीच बोलण्याचा अधिकार नाही,' असे त्यांनी सुनावले. ' या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणाच्याही मनात संदेह नसावा. आम्ही याप्रकरणी संबंधितांशी चर्चा करत आहोत. सैनिकांचे हित लक्षात घेऊनच त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल' असे त्यांनी सांगितले.
या मुलाखतीदरम्यान मोदींनी भूमी-अधिग्रहण विधेयकाच्या मुद्यावरही मत मांडले. 'भूमी अधिग्रहण विधेयक हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा अथवा जीवन-मरणाचा प्रश्न नाही. तसेच हा पक्षाचा किंवा सरकारचाही अजेंडा नाही. या विधेयकाचा मसुदा सर्व मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच तयार करण्यात आला असून त्याबाबत अजूनही कोणी काही सूचना दिल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू. हे विधेयक शेतकरी-विरोधी असल्याचा अपप्रचार सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या 'सुटा-बुटातील सरकार' या टीकेलाही मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'विरोधी पक्षांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते हताश झाले असून त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत' असे मोदी म्हणाले.