नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव आणि प्रदीर्घ काळ लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनबाबत सरकारला सल्ला देत असलेल्या तज्ज्ञांनी आता वेगळा सूर आळवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या आणीबाणीच्या परिस्थितीतील टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि लॉकडाऊनवरील टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी १६ मेपर्यंत कोविड-१९चे रुग्ण शून्यावर येतील हा आधी केलेला दावा मागे घेतला आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोविड-१९ चे मृत्यू आणि रुग्ण यांच्या संख्येचा अंदाज असल्याचे म्हटले. डॉ. पॉल हे एम्समधील लहान मुलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले डॉक्टर असून ते नीती आयोगाचे सदस्यही आहेत.
डॉ. पॉल यांनी गेल्या २४ एप्रिल रोजी केलेल्या निवेदनाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘मी केलेल्या त्या सादरीकरणाचा (प्रेझेंटेशन) चुकीचा अर्थ लावला गेला. त्या सादरीकरणात प्रसारमाध्यमांसमोर स्लाईड सादर केली गेली होती. तीत तो दावा केला गेला होता व मी तो व्यक्तिश: केला नव्हता.’’
कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे तशी सरकारला टास्क फोर्सने फसवल्याची टीकाही. डॉ. पॉल २३ मे रोजी प्रसारमाध्यमांसमोर पुन्हा एकदा आले. तेव्हा त्यांच्यासोबत होते सांख्यिकी विभागाचे सचिव. कोविड-१९ बद्दलचे अंदाज सरकारने गणितज्ञ, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून काढले होते याचा खुलासा करताना त्यांना वेदना होत होत्या आणि पहिल्यांदाच त्यांनी बोस्टन कन्सल्ंिटग ग्रुप, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन व सरकारला अंदाज सांगितलेल्या खासगी संस्थांची नावेही घेतली.
डॉ. रणदीप गुलेरिया हे डॉ. पॉल अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सशी संबंधित नव्हते. त्यांनी जुलै महिन्यात भारतात टोक गाठलेले असेल आणि रुग्णवाढीचा आलेख आडवा होणे त्यानंतर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु त्यांनी ताबडतोब असेही म्हटले होते की, ही सगळीच गणितीय गणना आणि अंदाज आहेत. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात तज्ज्ञांनी सरकारला मृत्यू आणि रुग्णसंख्येबाबत सल्ला देताना फसवले आहे, असे वृत्त पहिल्यांदा दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच चिंतेत आहेत.नेमकी संख्या किती असेल?
पॉल यांचा अंदाज आता असा आहे की, भारतात अजून रुग्णवाढीचे टोक गाठले जायचे असून, ते जूनअखेर घडू शकते. टास्क फोर्सचा दावा असा आहे की, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या १४ ते २८ लाख होणे आणि मृत्यू ७८ हजारांपर्यंत जाणे टाळले. नेमकी संख्या किती असेल हे मात्र फोर्स सांगू शकला नाही.