नवी दिल्ली : केंद्र सरकारने उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (Budget Session) आज सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) बोलावली आहे. दुपारी १२ वाजता संसद भवनात (Parliament) ही बैठक होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi), केंद्रीय मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील पक्षांचे नेते यात सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकार सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्य करण्याची मागणी करणार आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षणही (Economic Survey) मांडले जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे.
दरम्यान, आजच्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी आपल्या चिंतेचे मुद्दे मांडणे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात येणारे मुद्दे सरकारकडे मांडणे अपेक्षित आहे. यानंतर दुपारी सभागृहात सहकार्याच्या रणनीतीसाठी एनडीएच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा केंद्रीय अर्थसंकल्प २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असू शकतो.
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालणार असून ६६ दिवसांत २७ बैठका होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत संबंधित विभागांच्या संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागणीची तपासणी करू करतील आणि आपल्या मंत्रालय आणि विभागांशी संबंधित अहवाल तयार करू करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार असून ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे.