ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - रिमोट कंट्रोलने सरकार चालवणा-यांना इतरांना प्रश्न विचारण्या अधिकार नाही, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे खरे ‘बॉस’ आहेत अशी टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. त्याला संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाची गेल्या तीन दिवसांपासून समन्वय समितीची बैठक सुरू असून शुक्रवारी बैठकीच्या शेवटच्या दिवशी संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. 'ही बैठक सरकारच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी नव्हे तर त्या बैठकीत आम्ही देशाच्या विकासासंबंधी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली', असे होसबळे यांनी सांगितले. दहशतवाद, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा व्यवस्था, शिक्षणाचा प्रसार, तसेच विकासाचे सामाजिक व आर्थिक मॉडेल्स यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. रामजन्मभूमीच्या वादावर संघाची काय भूमिका आहे असा प्रश्न होसबळे यांना विचारले असता 'राम जन्मभूमीवर मंदिर उभारायला हवे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत मी आत्ता काहीही बोलू शकत नाही,' असे त्यांनी सांगितले.
'संघाने सरकारसाठी कोणताही "अजेंडा" सेट केलेला नाही, मोदींनी लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करावी, अशीच आमची इच्छा आहे', असेही होसबळे म्हणाले. 'संघ सरकारच्या एकूण कामगिरीवर संतुष्ट आहे. मात्र कोणत्याच सरकारच्या कामगिरीवर १०० टक्के संतुष्ट होणे शक्य नाही, पण सरकारची दिशा व दृष्टिकोन विधायक आहे' असे त्यांनी सांगितले.