उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याचे समोर आले आहे. ऊर्जा विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था इतकी बिकट झाली आहे की इमारीतीचे छत डोक्यावर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी डोक्यावर हेल्मेट घालून काम करण्याची वेळ ओढावली आहे.
छताचा काही भाग कोसळल्यामुळे विभागातील कर्मचारी याआधी देखील जखमी झाले आहेत.परंतु त्यानंतर देखील सरकार इमारतीच्या सुधारणेसाठी कोणतेच पाऊल उचलत नसल्यामुळे छत कोसळण्याच्या भीतीने कर्मचारी रोज डोक्यावर हेल्मेट घालून काम करत आहेत.
कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला विचारले असता इमारतीची वाईट अवस्था झाली असून आमच्या डोक्यावरील छत कधी कोसळेल काही सांगता येत नाही. या स्थितीत आमच्या डोक्याला कोणतीही दुखापत होऊ नये, म्हणूनच आम्ही हेल्मेट घालून काम करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन या विभागातील मुख्य अभियंतास के. के. भारद्वाज यांनी सांगितले.