कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सद्यस्थितीचा आढावा घेत केंद्र सरकारनं व्यावसायिक खासगी विमान उड्डाणावरील (शेड्युल इंटरनॅशनल कमर्शियल फ्लाइट्स) बंदीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक खासगी विमान प्रवासावर आता ३० सप्टेंबरपर्यंत बंदी असणार आहे. डीजीसीएकडून याबाबतचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे. (Government extends suspension scheduled international commercial passenger flights till 30 September)
डीजीसीएनं कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसायिक खासगी विमान उड्डाणावर याआधीच्या आदेशानुसार ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घातली होती. त्यात आता एका महिन्याची वाढ करुन बंदी ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान हे निर्बंध आंतरराष्ट्रीय कार्गो विमान उड्डाणांवर लागू असणार नाही. यासोबतच डीजीसीएकडून मंजुरी मिळाली असेल अशा विमान उड्डाणांना देखील यातून सूट देण्यात आली आहे.
मार्च २०२० साली केंद्र सरकारनं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पहिला लॉकडाऊन लावला होता. यात देशातील रेल्वे, विमान आणि जवळपास सर्वच सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली होती. मे महिन्यापासू विमान प्रवास पूर्ववत करण्यात आला होता. पण यात केवळ डोमॅस्टीक विमानसेवा सुरू करण्यात आली होती. तर आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर आजही काही निर्बंध लागू आहेत.