नवी दिल्ली- गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे राजधानीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु तरीही अण्णांच्या उपोषणाची भाजपा सरकारनं गांभीर्यानं दखल घेतलेली नाही. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत अण्णांनी जनतेशी संवाद साधला आहे.ते म्हणाले, सरकार वचन पाळत नसून जनतेला फक्त आश्वासनं देते, चार वर्षांत भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. अण्णांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीत दाखल झाले आहेत. गिरीश महाजन लवकरच रामलीला मैदानावर जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस लक्षणीय ठरला होता. त्या दिवशी ‘नो लोकपाल, नो मोदी’ या घोषणाबाजी देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लोकपाल नियुक्त करा, या मागण्या केल्या गेल्या. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणा-या शेतक-यांची संख्या यंदा लक्षणीय आहे. अण्णा म्हणाले होते, पंजाब, हरयाणातून येणा-या शेतक-यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली होती.आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत. सरकार काही कागदपत्रे पाठवणार आहे. त्यांचा अभ्यास करून, पुढची दिशा ठरवू. मागण्या मान्य करायला सरकार तयार असेल तर आम्हाला आंदोलन करण्यात आनंद नाही, असे अण्णा म्हणाले. जनलोकपाल आणि सोबतच इतर मागण्यांसाठी अण्णा 23 मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.
चार वर्षांत भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यात सरकार अपयशी, अण्णांचा नरेंद्र मोदींवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 5:37 PM