नवी दिल्ली : अणुऊर्जेचे फायदे काय आहेत हे लोकांना पटवून देण्यात सरकारला अपयश येत आहे. परिणामी, महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विलंबासाठी सरकारच दोषी आहे, असे मत केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेकडून केला जाणारा जोरदार विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढल्यानंतर दोनच दिवसांनी सिंग यांनी हे मत व्यक्त केले आहे.महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ९९०० मेगावॉट क्षमतेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा सर्वांत वैभवशाली अणुऊर्जा प्रकल्प बनावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रकल्पाबाबत अनेक चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत. परंतु एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आम्ही याकडे बघत आहोत. संपूर्ण अणुऊर्जा विभागाचे याकडे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यात कदाचित आम्ही कमी पडलो आहोत, असे सिंग म्हणाले.वास्तविक, हा प्रकल्प पर्यावरणाला पोषक आणि वातावरणाला पोषक असा प्रकल्प आहे. आम्ही लोकांना त्याचे फायदे पटवून देण्यात अपयशी ठरलो तर हा प्रकल्प रखडेल आणि त्याचा दोष सरकारलाच द्यावा लागेल, असे सिंग यांनी स्पष्ट केले. ‘असोचेम’ने आयोजित केलेल्या अणुऊर्जा संमेलनात ते बोलत होते. सिंग म्हणाले, आम्ही सर्व बाबींचा अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या भागात अणुऊर्जा प्रकल्प असणे हे धोकादायक वा हानिकारक नाही, हे या अभ्यासामधून सिद्ध झाले असल्याचे लोकांना सांगण्याची आज गरज आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा विभागाचे सचिव रतनकुमार सिन्हा यांनीही जैतापूर प्रकल्प सुरू करण्याचे समर्थन केले. या प्रकल्पामुळे कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जैतापूरच्या जनजागृतीत सरकार अपयशी
By admin | Published: May 16, 2015 3:51 AM