नवी दिल्ली - संरक्षण दलांबाबतचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. जावडेकर म्हणाले की, ''संरक्षण दलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदावरील व्यक्ती ही फोर स्टार जनरल दर्जाची असेल. तसेच त्यांच्याकडे सैन्य व्यवहार विभागाचे प्रमुखपद असेल.''
''देशातील सशस्त्र दले ही पूर्णपणे सैन्यविषयक विभागाच्या देखरेखीखाली असतील. तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नेतृत्वाखालील हा विभाग सैनिकीविषयांबाबत आपला सल्ला देईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले होते. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी म्हणाले होते. ''चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम असेल. सध्या जग वेगानं बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल,''असा विश्वास मोदींनी त्यावेळी व्यक्त केला होता.