नवी दिल्ली - सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’ कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने आता येत्या 31 मार्च 2018 पर्यंत वाढविली आहे. आधी ही मुदत 31 डिसेंबर 2017 होती. आज केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. एकूण 135 सरकारी योजनांसाठी ‘आधार’ सक्तीचे आहे. गरीब महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल आणि खतांवरील सबसिडी, सार्वजनिक वितरणप्रणालीमार्फत चालविण्या येणारी स्वस्त धान्य दुकाने, मनरेगा आदी योजनांचा त्यात समावेश आहे. या सर्व योजनांना आधार बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या व्यक्तीजवळ आधार कार्ड नाही त्यांनाही 31 मार्च 2018 पर्यंत सरकारी योजनांचा लाभ घेता येईल अशी भूमिका केंद्र सरकारकडून के.के. वेणुगोपालन यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. यापूर्वी बँक खात्याशी आधर लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवून 31 डिसेंबर 2017 करण्यात आली होती.
सद्यस्थितीत बहुतांश बँका आधार कार्ड आणि खाते जोडण्याची सेवा देत आहेत. मात्र, अजूनही बऱ्याच जणांकडे आधार कार्ड नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2018 पर्यंत आधार कार्ड काढणं गरजेचं करण्यात आलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापासून मोबाईल फोन कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र सरकारनं मोबाईल फोनच्या सिम कार्डला आधारशी लिंक करण्याची मुदत फेब्रुवारी 2018पर्यंत वाढवली आहे. तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला नाही, तर तो नंबर बंद होणार आहे.