मुंबई- मध्य प्रदेश सरकारकने भय्यू महाराज यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. राज्याच्या स्थापनेपासून संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ होती. पण भय्यूजी महाराज यांनी राज्यमंत्रिपद नाकारलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. मराठा आरक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीसाठी जनजागृती अभियान चालवण्यासाठी एक विशेष समिती स्थापण्यात आली आहे. या समितीमध्ये नर्मदानंद, हरिहरानंद, कॉम्प्यूटर बाबा, भय्यू महाराज आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. या पाचही जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण, जल संरक्षण आणि स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यासाठी ही विशेष समिती तयार करण्यात आली आहे.