मुंबई: बँक खातेधारकांच्या फसवणुकीचं, ऑनलाईन गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचा फटका अनेकांना बसतो. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाची नियमावली आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वत:च्या बँक खात्याचं संरक्षण करता येईल. केंद्रीय गृह मंत्रालयानं सायबर सुरक्षा आणि जागरूकतेसाठी 'सायबर दोस्त' नावाच्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना विविध सूचना देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी बँकेच्या कामासाठी दोन ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तनं दिला आहे. ग्राहकांनी एका ई-मेल खात्याचा वापर संवाद साधण्यासाठी, तर दुसऱ्या खात्याचा वापर व्यवहारांसाठी करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.'नेहमी दोन वेगवेगळी ई-मेल खाती वापरा. त्यातील एकाचा वापर तुमच्या विश्वासातील माणासांसोबत संवाद साधण्यासाठी आणि दुसऱ्याचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करा. सोशल नेटवर्किंग साईट्ससाठी वेगळं ई-मेल खातं वापरा. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता,' असं सायबर दोस्तनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.ऑनलाईन फसवणूक करणारे अनेकदा ई-मेल पाहून ग्राहकांना आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याची, क्रेडिट कार्ड्सची माहिती देऊन आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळेच सरकारनं सायबर दोस्तच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्याच्या सुरक्षेसाठी उपयुक्त टिप्स देण्यास सुरुवात केली आहे. 'तुम्ही आर्थिक व्यवहारांसाठी वापरत असलेल्या ई-मेल खात्याचा उल्लेख सोशल मीडियावर कुठेही करू नका. सोशल मीडियावर अकाऊंट सुरू करताना आर्थिक व्यवहारांसाठी वापरत असलेल्या ई-मेल खात्याचा उपयोग करणं टाळा,' असा सल्ला सायबर दोस्तनं दिला आहे.विविध प्रकारची वेब ब्राऊजर्स वापरताना सीव्हीव्ही, एक्स्पायरी डेट, कार्ड नंबर, बँक खाते क्रमांक अशी अतिशय संवेदनशील स्वरुपाची माहिती प्रत्येकवेळी टाईप करा. त्यासाठी ऑटो-फिलचा पर्याय निवडू नका, असं आवाहन सायबर दोस्तनं केलं आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही फसवणूक करू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचा सल्लादेखील याआधी सायबर दोस्तनं दिला होता. 'सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवाराकडून आर्थिक मदत मागितली जाऊ शकते. त्यामुळे सावध राहा,' असं सायबर दोस्तनं म्हटलं होतं.
ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी 'सायबर दोस्त'; केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 8:21 AM