बंगळुरू - देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणूक निकालात भाजपाने घवघवती यश मिळवलं आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांसाठी भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून भाजपाने तयारीही सुरू केली आहे. येथील तेलंगणात राज्यातही भाजपने १ जागेवरुन ८ जागांवर आघाडी घेतली. मात्र, येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यही भाजपला गमवावं लागलं होतं. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलं आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपने आश्चर्यकारक सरकार स्थापन केलं होतं. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंना आपल्या पक्षात घेत भाजपाने तेथील काँग्रेसचं सरकार पाडलं. तसेच, महाराष्ट्रातही शिवसेनेत मोठा बंड झाला आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० ते ५० आमदारांनी भाजपासोबत महायुती करुन सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता, भाजपने कर्नाटकातही तोच फॉर्म्युला अवलंबण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. कारण, जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी लवकरच कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.