लखनऊ : उत्तर प्रदेशात आता गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे चांगलेच महाग पडणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास पहिल्यांदा एक हजार आणि दुसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. उत्तर प्रदेश मोटार वाहन नियमावलीनुसार वाढीव दरावर दंड आकारण्याचा आदेश गुरुवारी देण्यात आला.
या आदेशानुसार, आता दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल तर एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पार्किंगच्या उल्लंघनासाठी पहिल्यांदा ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा १५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच, सीट बेल्टशिवाय कार चालविली तर एक हजार रुपये आणि विना परवाना गाडी चालविली किंवा १४ वर्षांखालील मुलांनी वैध परवान्याशिवाय चालविली तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
याचबरोबर, याआधी अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकले नाही आणि कामात अडथळा आणल्याबद्दल एक हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता तो वाढवून दोन हजार रुपये केला आहे. याशिवाय, ड्रायव्हिंग लायसन्सबाबत चुकीची माहिती दिल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच, अग्निशमन दलाच्या गाडी व रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
याशिवाय, सुसाट म्हणजेच वेगाने कार चालविली तर दोन हजार रुपये तर व्यावसायिक वाहनांना चार हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अपंग व्यक्तीला गाडी चालवताना पहिल्यांदा एक हजार आणि दुसऱ्यांदादंड दोन हजार रुपये असेल. दुचाकीवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त जण प्रवास करत असतील तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रुपये आणि दुसऱ्यांदा दोन हजार रुपये दंड ठोठावला जाईल. जर तुम्हाला पहिल्यांदा विनाविमा वाहन चालविताना पकडले गेले तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा चार हजार रुपये दंड ठोठावला जाईल. राज्य सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी नियम कठोर केले आहेत.
या नियमांनुसार, वाहनाचे मॉडेल बदल्यानंतर निर्माता आणि डीलरला प्रति वाहन एक लाख दंड भरावा लागेल. मोटार वाहनाच्या नियमांविरोधात वाहन मालकाने वाहन बदलल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही शर्यतीत किंवा चाचणीत भाग घेण्यासाठी पहिल्यांदा पाच हजार द्यावे लागतील. तसेच, जर परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या शर्यतीत किंवा चाचणीत भाग घेतल्यास तुम्हाला दहा हजाक रुपये दंड भरावा लागेल. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्याबद्दल एका व्यक्तीला दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.