पाटणा : त्यांच्या सगळ्याच सभांचे दृश्य जवळपास सारखेच असते. तुफान गर्दी, मोजक्या लोकांच्या चेहेऱ्यावर मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा; पण बिहारमधील महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे हेलिकॉप्टर जसे नजरेस पडते, तेव्हापासून गर्दी त्यांचा जयजयकार करायला लागते. गर्दीतून वाट काढतच त्यांना स्टेजवर जावे लागते.
तेजस्वी बोलायला सुरुवात करतात - ‘एक मौका मिलेगा, तो जिस दिन पे मंत्रिमंडल कि बैठक होगी, पहली बार मुख्यमंत्री होते हुए पेन चलेगी, तो देश के इतिहास में पहली बार एक साथ दस लाख नौजवान को इकठ्ठे सरकारी नौकरी मिलेगी.’
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १० लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे हे आश्वासन ऐकून घेण्यासाठी लोक आसुसलेले असतात. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला तेजस्वी यांच्या सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होणार नाही असे वाटते.