नवी दिल्ली- मोदी सरकारनं नोकरदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला UPSC परीक्षा उत्तीर्ण न करताही अधिकारी बनता येणार आहे. आता वरिष्ठ अधिकारी बनवण्यासाठी यूपीएससीची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं नाही. तसेच खासगी कंपनीत काम करणा-या नोकरदारांनाही मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयाबाबतची अधिसूचना मोदी सरकारनं जारी केली आहे.कार्मिक व प्रशिक्षण विभागासाठी या पदांवर नियुक्त करण्याच्या अधिका-यांसाठी विस्तार स्वरूपात मार्गदर्शिकेसह अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सरकारला आता सेवा नियमातही बदल करावा लागणार आहे. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, सद्यस्थितीत या निर्णयामुळे कर्तृत्ववानांना योग्य संधी मिळणार आहे. भारतीय नागरिकांना स्वतःची प्रतिभा आणि क्षमता दाखवता यावी, यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच या अधिका-यांना तीन वर्षं संधी देण्यात येणार आहे. डीओपीटीनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील जॉइंट सेक्रेटरीच्या पदावर नियुक्ती होणार आहे. तसेच नवनियुक्त अधिका-यांना 3 वर्षं काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांची कामगिरी पाहून त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. या पदांसाठीच्या अर्जांना वयाची अट शिथिल करण्यात आली असून, तुम्ही 40 वर्षांपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकता. तसेच या अधिका-यांचं वेतनही सहसचिवाएवढं असून, त्यांना इतर वरिष्ठ अधिका-यांसारख्याच सुविधा मिळणार आहेत. या अधिका-यांची मुलाखत मंत्रिमंडळ सचिवाच्या नेतृत्वाखाली कमिटी घेणार आहे. पदवीधर, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, खासगी कंपनीतील व्यक्तीही यासाठी अर्ज करू शकतो. फक्त त्याला त्याच्या क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव हवा. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै आहे.
आता UPSC परीक्षा पास न करता बनता येणार ऑफिसर, मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:04 IST